टेंबे स्वामी : देवाकडे मागताना नेमके काय मागावे, ज्यामुळे सर्व काही मिळेल.

तेंबे स्वामी

प. पूज्य टेंबेस्वामींनी लिहिलेले एक पद

दत्ता मजला प्रसन्न होसी जरी तू वर देसी।
तरी मी आण न मागे तुजसी, निर्धारूनी मानसी।।धृ।।
स्मरण तुझे मज नित्य असावे, तव गुण भावे गावे।
अनासक्तीने मी वागावे, ऐसे मन वळवावे।।१।।
सर्व इंद्रिये आणि मन हे तुझे हाती आहे।
यास्तव आता तू लवलाहे, स्वपदी मन रमवावे।।२।।
विवेक आणि सत्संगती हे, नेत्र त्वय बा आहे।
वासुदेवा निर्मल देहे, जेणे त्वतपदी।।३।।

प.पु. टेंबे स्वामी हे दत्त संप्रदायातील सर्वोच्च मानबिंदू असलेले नाव. जे नाव जरी नुसते उच्चारले तरी भावविवश होऊन डोळ्यात पाणी तरळावे. प्रत्येक क्षण न क्षण ज्यांनी दत्तगुरूंना समर्पित केला, त्यांचे वरील पद हे इतके अर्थपुर्ण आहे, आमच्या सारख्या जढमूढाना त्यातून काही बोध घेता आला तर जीवनाचे सार्थक होईल. जे स्वतः च प्रत्यक्ष दत्त होते, त्यांनीच दत्तात्रेयांना प्रसन्न झालात तर मी काय मनातले मागणे मागु, असा प्रश्न केला आहे. म्हणजे ही तेजाने तेजाची केलेली आळवणी आहे.

स्वामी म्हणतात, हे प्रभो, जर तुम्ही मला प्रसन्न झालात तर तुमच्याकडे मी स्वतः साठी नाही, या विश्वासाठी मागणे मागतो, कारण हे सर्व प्रपंचाचा दाह सोसलेले भक्त अनन्य भावाने तुला शरण आले आहेत, त्यांना या भवसागरातून पार होण्यासाठी तुझ्या सारखा नावाडी असेल तरच हे शक्य आहे.हे दत्तात्रेया, तुझे मला सतत स्मरण राहू दे. असा एकही क्षण नसू दे, की ज्या क्षणाला मी तुझे स्मरण करणार नाही. पण त्यासाठी माझे हे अंतःकरण निर्लेप होऊ दे, कोणत्याही गोष्टीची मला आसक्ती असू नये, आणि हे तूच करू शकतोस, म्हणून हे गुरुराया मला या षडरिपूतून बाहेर काढ.

( स्मरण तुझे मज….)मी मनोवाक्कायकर्मे तुझ्या स्वाधीन झालो आहे, माझी ही काया आणि मन हे सर्व तुला समर्पित केले आहे, त्यामुळे आता तुझे हे चरण सोडुन मला कुठेही जायचे नाही. तू मला स्वतः च्या चरणी लीन होण्यासाठी वळव, एवढी एकच प्रार्थना तुझे चरणी आहे.( सर्व इंद्रिये आणि मन हे…)तुझे नेत्र हे विवेक म्हणजे सद्बुद्धी, आणि सत्संगती हे असुन या नेत्रांनी तू माझ्या कडे कृपा दृष्टीने पहा, म्हणजे माझ्या तन मनात अंतर्बाह्य बदल होऊन मी सतत तुझ्या चरणाशी राहीन. हे दत्त प्रभो माझी ही विनंती ऐक आणि मला आपल्या चरणाचा ठाव दे.

खरच टेंबे स्वामींनी आम्हा पामरासाठी दत्त प्रभुकडे किती कळकळीची विनंती केली आहे.आम्ही ह्या उत्सवा निमित्ताने त्यातील काही अंश जरी उचलला तरी आमचे जीवन कृतार्थ होईल आणि या देहाचे सोने होईल.

श्री गुरुदेव दत्त

Share On:

Leave a Comment