श्री नवनाथ भक्तीसार अध्याय- १

अवताराची पूर्वकथा , शंकराकडून पार्वतीस उपदेश व मच्छिंद्रनाथांचा जन्म

फलश्रुती - या अध्यायाच्या श्रवण किंवा पठन केल्याने समंधबाधा नाहीशी होते.

श्रीगणेशाय नमः ।। द्वापारयुगाच्या अंती पुढे येणाऱ्या कलियुगात भक्तिमाहात्म्य वाढवून लोकांचा उद्धार करण्याच्या दृष्टीने द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णाने जो बेत आखला होता तो सर्वांना कळविण्यासाठी त्यांनी एका विशेष सभेचे आयोजन केले होते . त्या सभेत अनेक मान्यवर भक्त , श्रेष्ठ ऋषी व नवनारायण उपस्थित होते . अतिथिगत सत्कारादी प्रारंभिक गोष्टी पूर्ण झाल्यावर श्रीकृष्णाने आपले मनोगत व्यक्त केले . त्यात त्यांनी कलियुगात अवतार घेऊन कोणी कसे कार्य करायचे ते सविस्तर सांगितले , ते म्हणाला , ” नऊ नारायणांपैकी कवीने मच्छिंद्र , हरीने गोरक्ष अंतरिक्षाने जालिंदर , प्रबुद्धाने कानिफ , पिप्पलायनाने चर्पटी , आविर्होत्राने वटसिद्ध नागनाथ, द्रुमिलाने भर्तरी तर , चमसाने रेवण व करभाजनाने गहिनी या नावाने प्रकट होऊन नाथसंप्रदायाची स्थापना करून धर्मकार्य करावे . त्या वेळी इतर ऋषीही अवतार घेऊन कार्य करतील , कवी वाल्मिकी तुलसीदास होईल , शुकमुनी महाभक्त कबीर होईल , महामुनी व्यास जयदेव होईल , माझा प्राणप्रिय उद्धव नामदेव होईल , भक्तश्रेष्ठ जांबुवंत नरहरी होईल , बंधू बलराम पुंडरिक नावाने प्रसिद्ध होईल तर कैलासपती शंकर , मी स्वतः, ब्रह्मदेव व आदिमाया ही मंडळी निवृत्ती , ज्ञानदेव , सोपान आणि मुक्ताबाई या चार भावंडांच्या रूपात प्रकटून कार्य करतील . या वेळी हनुमंत रामदास तर कुब्जा जनाबाई होईल . याप्रमाणे आपण सर्वांनी अवतार घेऊन भक्तिमाहात्म्य वाढवायचे आहे . ” ते ऐकून यदुसमेत भगवत्कार्यास सर्वांनी आपली सहमती दर्शविली . त्यानंतर भगवान श्रीकृष्णाला वंदन करून आमंत्रित सर्व मंडळी आपापल्या स्थानी गेली . नवनारायण द्वारकेहून मंदराचलावर गेले आणि तेथे शुकाचार्यांच्या समाधीजवळ योगसमाधी लावून आपापल्या जन्माच्या वेळेची प्रतीक्षा करू लागले . कालांतराने पूर्वीच ठरल्याप्रमाणे ते सर्वजण शुक्राचार्यांसह ईशकार्यास्तव प्रकट झाले त्यांचीच चरित्रलीला या ग्रंथात दिली आहे.

शंकरांकडून पार्वतीस उपदेश

एकदा भगवान शंकर आणि माता पार्वती कैलासावर बसले होते तेव्हा पार्वतीने शंकराना विचारले आपण ज्या पवित्र मंत्राचा जप करता त्याचा मलाही उपदेश द्या अशी विनंती केली . तेव्हा ते पार्वतीसह यमुनातीरी एकान्तस्थानी आले . तेथे तिला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून बीजमंत्र सांगितला ते म्हणाले , ” माझ्या बोलण्यातून तुला काय बोध झाला तो तूच मला सांग त्या वेळी पार्वती काही बोलणार तोच यमुनेच्या पाण्यातून शब्द आला सर्वत्र एकमेव अद्वितीय असे ब्रह्मच व्याप्त आहे . आता मी तू असे द्वैत राहिलेच नाही . ते ऐकून पार्वतीला मोठे नवल वाटले . तेव्हा अंतर्ज्ञानाने सर्व प्रकार जाणून शंकर पार्वतीला म्हणाले , ” पूर्वी उपरिचर नामक बसू आकाशमार्गे विमानातून जात असता उर्वशी अप्सरेला पाहून कामवासनेने अत्यंत व्याकूळ झाला . त्या वेळी त्याचे स्खलित झालेले वीर्य यमुनेच्या पात्रात पडले , ते वीर्य एका मत्स्यीने गिळले . त्यामुळे ती गर्भवती होऊन तिच्या गर्भात कविनारायणाने संचार केला आता मी तुला केलेला उपदेश त्याने ऐकला असून आपण ऐकलेले शब्द त्याचेच आहेत . ” त्यानंतर कविनारायणास तू पुढे बद्रिकाश्रमास ये तेथे मी तुला भगवान दत्तात्रेयांकडून प्रत्यक्ष उपदेश देववीन असे सांगून शंकर पार्वतीसह कैलासावर निघून गेले .

मच्छिंद्रनाथांचा जन्म

पुढे काही दिवसांनी मत्स्यीने तो गर्भ अंड्यासहित यमुनेच्या तीरावरील वाळूत टाकला . ते अंडे भक्ष्याच्या आशेने बकपक्ष्यांनी फोडले . त्यातून एक दिव्य बालक प्रकट झाले. प्रखर उन्हामुळे ते रडू लागले . तेव्हा बकपक्षी घाबरून उडून गेले . त्या वेळी त्याचे रडणे ऐकून कामिक नावाच्या कोळ्याने त्याला आपल्या घरी नेले शारद्वता ही त्याची पत्नी . तिला मूलबाळ नव्हते . त्या बालकाला देवाचा प्रसाद समजून तिने त्याचा सांभाळ केला . त्याचे ‘ मच्छिंद्र ‘ असे नाव ठेवले . मच्छिंद्र पाच वर्षांचा असताना पित्यासमवेत यमुनेवर गेला होता . तेथे कामिक जाळ्यात पकडलेले मासे काठावरील वाळूत टाकू लागला .तडफडणाऱ्या माशांना पाहून मच्छिंद्राला त्यांची दया आली . त्याने ते मासे पुन्हा नदीत सोडण्यास सुरुवात केली. ते पाहून संतापलेल्या कामिकाने त्याच्या तोंडात एक चपराक मारली व तुला हा शहाणपणा करायला कोणी सांगितले? भूतदया करून पोटात काय भिक्षान्न घालणार आहेत ? ” असे म्हणून तो पुन्हा मासे पकडण्यास गेला , तेव्हा दुसऱ्याचे जीवित हरण करून जगण्यापेक्षा दोषरहित असे भिक्षान्न खाऊन राहिलेले बरे ” असा विचार करून मच्छिंद्र आपल्या धर्मपित्याची नजर चुकवून पळाला . पुढे ठिकठिकाणी हिंडत तो बद्रिकाश्रमास गेला तेथील शांती व स्थानपावित्र्य पाहून त्याला खूप बरे वाटले . तेथे त्याने बारा वर्षे निराहार राहून घोर तपश्चर्या केली . त्या तपाने त्याचा देह अक्षरशः अस्थिपंजर व काष्ठवत झाला होता . अशा प्रकारे मच्छिंद्राची तपश्चर्या चालू असताना एके दिवशी भगवान दत्तात्रेय बद्रिकाश्रमास आले तेथे त्यांनी शिवालयात प्रवेश करून शंकरांची स्तुती केली . तेव्हा रुद्राने प्रकट होऊन त्यांना दर्शन दिले आणि त्यांचा उत्तम आदरसत्कार करून त्याना तेथील रम्य वनप्रदेश पाहण्यास नेले .

अध्याय पहिला समाप्त 

खाली क्लिक करून आपण ही कथा ऐकू शकता.


Share On:

Leave a Comment