नवनाथ भक्तीसार अध्याय -३

मच्छिंद्र – मारुती युद्ध , मच्छिंद्रनाथाचे मारुतीला आश्वासन

फलश्रुती- या अध्ययाच्या मनःपूर्वक पठणाने शत्रूंचा नाश होईल आणि घरात मारूतीचे वास्तव्य होईल.

श्रीगणेशाय नमः ॥ बंगाल देशातून बाहेर पडल्यावर मच्छिंद्रनाथ रामेश्वरास गेला . तेथे समुद्रस्नान करून परतत असताना त्याला एक वानर दिसला . तो मारुती होता व मुसळधार पावसापासून स्वतःचे रक्षण व्हावे म्हणून एका कपारीत गुहा करण्याचा प्रयत्न करीत होता . ते पाहून नाथास नवल वाटले . त्याचे खरे स्वरूप न कळल्यामुळे तो त्याला चेष्ठेने म्हणाला ” माकडा ! काय म्हणावे तुझ्या मूर्खपणाला ? या भयंकर वर्षावात तू कसे काय घर बांधणार ? अरे , तहान लागल्यावर विहीर खणण्यात काय अर्थ आहे ? ” ते ऐकून मारुती म्हणाला , ” बाबारे , एवढ्या शहाणपणाच्या गोष्टी बोलून मला उपदेश करणारा तू आहेस तरी कोण ? ” मच्छिंद्र म्हणाला , ” मी जती असून मला मच्छिन्द्रनाथ नावाने ओळखतात . ” त्यावर मारुती म्हणाला , ” माझ्या माहितीप्रमाणे एकटा हनुमानच तेवढा खरा जती आहे . तेव्हा तुझ्या रूपात हा नवीन जती कोठून उपटला ? बरं या पदव्या तुला कोणी दिल्या ? नाथ , जती या संज्ञा लावताना आपण त्या संज्ञांना पात्र आहोत का याचा विचार करायलाच हवा , नाही का ? ” तेव्हा मच्छिंद्र म्हणाला , ” एखाद्याच्या प्रतापशक्तीचा अनुभव आल्याशिवाय कोणी कोणाला अशा पदव्या देईल का ? ” त्यावर मारुती म्हणाला , ” मग पाहू दे तरी तुझे सामर्थ्य काय आहे ते । पूर्वी हनुमंताच्या सहवासात असताना मला त्याच्या कृपाप्रसादाने त्याची सहस्रांश शक्ती प्राप्त झाली आहे . त्या शक्तीचे तुला निवारण करता आले तर तुझ्या बोलण्यात काही तथ्य आहे असे मी समजेन अन्यथा तुझे हे किताब माझ्या हवाली करून तू चालता हो . ” तेव्हा त्याच्या आव्हानाचा स्वीकार करून मच्छिंद्र म्हणाला ” माकडा , उगीच वटवट कशाला करतोस ? मलाही पाहू दे तुझ्या अंगी काय पराक्रम आहे तो ” ते ऐकून मारुती संतापला . त्याने क्षणार्धात महाकाय रूप धारण केले आणि नाथावर पर्वतांचा मारा केला . ते पाहून ह्यो वानर सामान्य नसून साक्षात मारुती आहे हे नाथाने ओळखले आणि आपल्या मंत्रशक्तीच्या साहाय्याने त्या पर्वतांचे निवारण केले . ते पाहून चवताळलेला मारुती हातामध्ये डोंगर घेऊन त्याच्यावर धावला , तेव्हा नाथाने त्याच्यावर वाताकर्षण अस्त्राचा प्रयोग केला. त्यामुळे मारुतीची सर्व हालचालच थांबली . त्याचे प्राण कंठाशी आले . त्या वेळी आपल्या पुत्राची ती विकल अवस्था पाहून वायुदेव मच्छिंद्राला शरण गेला आणि मारुतीला मुक्त करण्याची विनंती केली . तेव्हा त्याच्या शब्दाचा मान ठेवून नाथाने मारुतीला अस्त्रमुक्त केले . तो देहभानावर येताच वायुदेवाने त्याला ‘ या नाथाच्या पाठीशी गुरूची अमोघ शक्ती आहे . त्यापुढे तुझा पराक्रम चालणार नाही , ‘ असे समजावले . मग त्या पितापुत्रांनी मच्छिद्राशी सख्य केले आणि त्याला त्याच्या कार्यात साहाय्य देण्याचे मान्य केले . तेव्हा त्या दोघांना वंदन करून नाथ मारुतीला म्हणाला , ” हे कपिराज़ , तू मार्तंड पर्वतावर मला अनुकूल झालास , शाबरी कवित्वास वरही दिलास आणि आता माझ्याशी युद्धही केलेस . हे कसे ? ” त्यावर मारुती हसून म्हणाला , ” मी तुला आधीच ओळखले होते . तू कोणाचा अवतार आहेस तेही मला माहीत आहे , पण मार्तंड पर्वतावर तुला देवतानी जे सामर्थ्य दिले ते अजूनही तसेच आहे किंवा नाही तेच मला पाहायचे होते . म्हणूनच मी तुझी मुद्दाम परीक्षा घेतली. आता मला तुझ्याविषयी काहीच चिंता नाही , ” ते ऐकून मच्छिद्रास अत्यानंद झाला .

मच्छिंद्रनाथाचे मारुतीला आश्वासन

त्या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करील मारुती मच्छिंद्राला म्हणाला , “ नाथा , कित्येक वर्षांपासून माझ्या मनावर एक ओझे आहे आणि ते दूर करण्यास फक्त तूच समर्थ आहेस . तेव्हा कृपा करून माझे कार्य तू पूर्ण करशील असे मला वचन दे . ” ते ऐकून नाथ म्हणाला,” पण मला कोणते काम करायचे आहे ते तरी सांगा . ” तेव्हा मारुती म्हणाला , ” नाथा , रावणवधानंतर श्रीराम व सीतामाईसह मीही अयोध्येस गेलो होतो . तेव्हा सीतामाई मला म्हणाली , ” हनुमंता , तुला माझी एक इच्छा पूर्ण करायची आहे . त्या बाबतीत तू मला आधी वचन दिलेस तरच ती इच्छा मी प्रकट करीन . ” त्या वेळी मी तिला तसे वचन देताच ती म्हणाली , ” तू गृहस्थाश्रमाचा स्वीकार करून संसारसुखाचा उपभोग घ्यावा असे मला वाटते . ” ते ऐकून मी हादरलो आणि रामप्रभूना आपले गाणे रडत रडत सांगितले , तेव्हा ते म्हणाले , ” बाबा रे , रावण नंतर तुला स्त्रीराज्यात जावेच लागते ही अनादी परंपरा आहे . प्रत्येक युगाच्या चौकडीत तुला , मला व रावणाला जन्म घ्यावाच लागतो आणि निर्धारित कार्यही करावेच लागते . तुझे स्त्रीराज्यात जाणे हे त्यापैकीच एक कार्य होय . आजपर्यंत असे ९ ८ वेळा झालेले आहे आणि आताची ही ९९ वी पाळी आहे . तेव्हा त निःशंक मनाने स्त्रीराज्यात जा . तू उध्वरेता आहेस . तुझ्या त्या भुभुःकाराने स्त्रिया गर्भवती होतील . त्यामुळे तुझे ब्रहाचर्यही टळणार नाही आणि तुला स्त्रीसंगाचे पातकही लागणार नाही . तेव्हा मनात नसूनही मी स्त्रीराज्यात गेलो . तेथे सर्व स्त्रियाच होत्या . मैनाकिनी नावाची राणी तेथे राज्य करीत होती . माझ्या भुभुःकाराने तेथील स्त्रिया गर्भवती राहू लागल्या पण एके दिवशी मैनाकिनीने घोर अनुष्ठान करून मला प्रसन्न करून घेतले आणि वरदान म्हणून प्रत्यक्ष शरीरसंगाची मागणी केली . तेव्हा मी तिला तुझी ही इच्छा पुढे मच्छिंद्रनाथ पूर्ण करील असे वचन दिले . ते वचन माझ्यासाठी पूर्ण कर म्हणजे मी मोठ्या विवंचनेतून मुक्त होईन ” ते ऐकून मच्छिंद्राच्या मनातही विकल्पांची वावटळ उठली , पण मारुतीने त्या सर्वांचे योग्य निरसन केले व ‘ मैनाकिनीच्या पोटी तुझा पिता उपरेचर वसू मीननाथरूपाने जन्म घेऊन महान कीर्तिध्वज फडकावील ‘ असे सांगितले , तेव्हा नाथाने त्याचे म्हणणे मान्य केले आणि वायु व मारुती यांना निरोप देऊन तो पुढील तीर्थयात्रेस निघाला.

अध्याय तिसरा समाप्त

अध्याय पाहण्यासाठी खाली क्लिक करा. 👇


Share On:

Leave a Comment