दत्तप्रभूंचा मच्छिंद्रास उपदेश, शाबरीविद्येची निर्मिती व ब्राह्मण स्त्रीस भस्मदान

फलश्रुती- या अध्यायच्या नित्य पठणाने अपार धनप्राप्ती होते व विजय होतो.

श्रीगणेशाय नमः ॥ भगवान शंकर व दत्तात्रेय चंद्रिकावनाची शोभा पाहत तीन दिवस संचार करीत होते . फिरता – फिरता त्यांची पावले अचानक थबकली . त्या अरण्यात एके ठिकाणी १७-१८ वर्षांचा बालयोगी मच्छिंद्र घोर तपश्चर्या करीत होता . त्या वेळी त्याचा अस्थिपंजर देह पाहून शिव आणि दत्तप्रभू दोघांनाही मोठे आश्चर्य वाटले . मग भगवान शंकरांनी त्याचा तपश्चयहितू जाणून घेण्यासाठी दत्तात्रेयांना त्याच्यापाशी पाठविले . त्यांनी मच्छिंद्राकडे जाऊन त्याला हाक मारली व म्हणाले,” हे तपस्वी तरुणा , तू एवढे घोर तप कशासाठी करीत आहेस ? ” ते ऐकून मच्छिंद्राने मोठ्या कष्टाने डोळे उघडले व समोर एका महायोग्याला पाहून नम्रपणे वंदन करून म्हणाला , ” गुरुदेव , गेल्या बारा वर्षांत मला येथे एकही मनुष्य दिसला नाही . पण ज्या अर्थी आपण येथे येऊन मला तपाचा हेतू विचारीत आहात त्या अर्थी आपण मला अनुग्रहरूपी प्रसाद देण्यासाठीच येथे आला आहात असे वाटते . तरी कृपया आपला परिचय द्या . ” तेव्हा दत्तप्रभू म्हणाले,” मी अत्रिनंदन असून तुझ्यावर कृपा करण्यासाठीच आलो आहे . ” ते ऐकून मच्छिंद्राच्या डोळ्यांत कृतज्ञतेने अश्रू तरळले . ” गुरुदेव , आपण सर्वज्ञ असूनही माझी बारा वर्षे उपेक्षा का केली ? ” असे म्हणून त्याने त्यांचे चरण धरले . तेव्हा कारुण्यमूर्ती दत्तप्रभूंनी मोठ्या प्रेमाने त्याचे सांत्वन केले आणि त्याच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवून त्याला दिव्य मंत्राचा उपदेश केला. त्या उपदेशाने मच्छिंद्राच्या अंतःकरणात निजबोध ठसला आणि त्याला एक ब्रह्मतत्वच सर्वत्र व्यापून असल्याची खूण पटली . त्यानंतर दत्तप्रभूंनी त्याला शंकरांच्या चरणांवर घातले. त्या वेळी त्यांच्याच सूचनेवरून भगवान दत्तात्रेयांनी मच्छिंद्राला कला , विद्या मंत्र व तंत्र शिकविले . त्याला देवतांच्या शक्ती प्राप्त करून दिल्या . अशा प्रकारे त्याला सर्व गोष्टींत समर्थ केल्यानंतर दत्तप्रभूंनी त्याला संप्रदायाच्या परंपरेनुसार योगदीक्षा देऊन ‘ नाथ ‘ ही संज्ञा ; शैली,शृंगी आदी अलंकार ; नाथपंथी भूषणे व दीक्षेचे सामर्थ्य देऊन नाथसंप्रदाय वाढविण्याची आज्ञा केली. त्यानंतर ते स्वस्थानी परतले आणि त्यांच्या आज्ञेने मच्छिंद्रही दक्षिणेकडे निघाला .

शाबरीविद्येची निर्मिती

पुढे पदभ्रमण करीत मच्छिंद्र सप्तशृंग पर्वतावर गेला, तेथे अंबेचे दर्शन घेऊन तो तिचे स्तवन करू लागला. संकटग्रस्त लोकांना उपयोगी पडेल असे दिव्य शास्त्र आपण काव्यरूपाने रचून ठेवावे अशी स्फूर्ती त्याला मातेच्या कृपेने झाली . पण त्यासाठी दैवतांची अनुकूलता आवश्यक होती . म्हणून त्याने देवीसन्मुख सात दिवसांचे अनुष्ठान केले . त्या सेवेने संतुष्ट झालेल्या भगवतीने त्याला दर्शन देऊन त्याची इच्छा विचारली असता तो म्हणाला , ” माते , शाबरीविधेवर कवित्व करण्याचा मानस आहे . त्या कार्यात सुयश लाभण्यासाठी मला मदत कर . ” तेव्हा देवीने त्याला मार्तंड पर्वतावर नेले . तेथे त्याच्याकडून बीजमंत्रोक्त हवन करविले . त्या प्रभावाने तेथे कांतिमान आणि विशालकाय असा नागवृक्ष प्रकट झाला . तो समस्त सिद्धींचे भांडार होता . त्याच्या प्रत्येक फांदीवर विविध दैवतांचा निवास होता . देवीने नाथाला त्यांचा परिचय देऊन त्यांना वश करून त्यांचा विद्यामंत्र प्राप्त करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगितला . ती म्हणाली , ” ब्रह्मगिरीजवळ अंजन पर्वत आहे . तेथे काचित नावाची एक दक्षिणगामी नदी आहे . तिच्या काठावर हत्तीच्या पावलाएवढी शंभर जलयुक्त कुंडे आहेत . पांढरी बेल घे . तिचा एकेक तुकडा प्रत्येक कुंडात टाकत पुढे जा . परतीच्या मार्गावर ज्या कुंडातील बेल सजीव दिसेल तेथील पाण्याने स्नान करून थोडे पाणी पी . त्याने तुला मूर्च्छा येईल . त्या वेळी मूर्च्छा जाईपर्यंत तू सूर्याच्या बारा नामांचा सतत जप कर त्यामुळे तू शुद्धीवर येशील . त्यानंतर सूर्याला वंदन करून तू त्या कुंडातील पाणी एका कुपीत भरून येथे आण . मग पुन्हा एकदा सूर्याच्या द्वादश नामांचा उच्चार करून त्या पाण्याने या नागवृक्षाला सिंचन कर . त्यामुळे या वृक्षावरील एक देवता प्रसन्न होऊन तुला ज्ञान देईल , यात मनौधैर्यान सहा महिने अथक परिश्रम करावे लागणार आहेत . म्हणजे प्रत्येक वेळी एक याप्रमाणे सर्व देवता तुला अनुकूल होतील . ” ते ऐकून नाथाने तिला वंदन केले , तेव्हा त्याला आशीर्वाद देऊन देवी स्वस्थानी निघून गेली. त्यानंतर देवीने सांगितल्याप्रमाणे सर्व विधी यथासांग करून नाथाने सहा महिन्यांत परिश्रमाअंती त्या नागअश्वथावरील सर्व दैवते प्रसन्न करून घेतली. त्यांनी दिलेल्या विदयांच्या आधारे त्याने शाबरीविद्या म्हणून एक स्वतंत्र ग्रंथ लिहिला . अशा प्रकारे सामर्थ्यवंत होऊन तो नाथ बंगालकडे निघाला .

ब्राह्मण स्त्रीस भस्मदान

बंगालमध्ये चंद्रगिरी नामक गावात सर्वोपदयाळ नावाचा एक श्रीमंत व धर्मानुगामी ब्राह्मण राहत असे. त्याची पत्नीही सुंदर, सद्गुणी व पतिव्रता स्त्री होती . त्या दांपत्यास मूलबाळ नव्हते म्हणून ती दोघे व्यथित असत . एके दिवशी नाथ त्याच्या घरी भिक्षेसाठी गेला असताना त्याचे तेजस्वी रूप पाहून ब्राह्मणीने त्याला आपली व्यथा सांगितली . तेव्हा नाथाने आपल्या झोळीतून चिमूटभर भस्म काढले . ते सूर्यमंत्राने भारले व ते तिला देऊन म्हणाला , ” तू याचे सेवन कर याच्या प्रभावाने तुझ्या पोटी हरिनारायण जन्म घेईल . पुढे बारा वर्षांनी मी स्वतः त्याला अनुग्रह देईन . ” त्यानंतर तिने दिलेली भिक्षा घेऊन तो निघून गेला . ही गोष्ट त्या ब्राह्मणीने शेजारच्या स्त्रियांना सांगताच त्यांनी तिला कानफाट्या साधूंच्या चेटूक – कथा सांगून घाबरवून सोडले . त्यामुळे तिच्या मनात विकल्प उत्पन्न होऊन तिने ते भस्म गोठ्याच्या मागे शेण टाकण्याच्या उकिरड्यात टाकून दिले .

अध्याय दूसरा समाप्त 
खाली क्लिक करून आपण ही कथा ऐकू शकता.

Share On:

Leave a Comment