गुरुपौर्णिमा विशेष – .. म्हणून गुरूला जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे !

गुरुपौर्णिमा 2022

सद्गुरू ओळखणे फार कठीण आहे. आपणास त्यांच्यासारखे व्हावे लागते तेंव्हाच ते कळतात. त्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे, श्री स्वामी समर्थ या दिव्य महामंत्रात एवढे प्रचंड सामर्थ्य आहे की, आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, म्हणजे मानवी देहातील सद्गुरूंचे कृपाशीर्वाद सेवेकऱ्यास सहज लाभतात .

अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चरचरम |
ततपदं दर्शीतं येन तस्मे श्री गुरवे नम: ||

भगवंताच्या कथा एकाव्यात, त्यांच्या लीला वर्णन कराव्यात, आपणास आलेल्या अनुभूति आपण इतरांना सांगाव्यात. मग सद्गुरूंना सापडत बसण्याची गरज नाही . आई मुलाची काळजी फार तर एका जन्मापर्यंतच, म्हणजे देह आहे तोपर्यंतच करील,पण ‘गुरु’ हा जन्मोजन्मी तुमची काळजी घ्यायला तयार आहे. तळमळ लागल्यावर गुरूभेट निश्चित होते, गुरूला अनन्य शरण जावे म्हणजे आणखी काही करण्याचे उरत नाही, गीतेत भगवंतानी अर्जुनाला ‘तू मला फक्त शरण ये’ असे सांगितले आहे.

पाणी हे जसे शरीराचे जीवन आहे तसे श्री स्वामी समर्थ हे नाव मनाचे जीवन आहे. हे नाव अंत:करणात इतके खोल जावे की प्राणाबरोबरच ते बाहेर पडावे. नामस्मरणात पाठीशी सद्गुरू सत्तारूपाने असतात. आपण करीत असलेले नामस्मरण त्यांच्या सत्तेने होत असल्याने ‘मी सेवा करतो’ असा अहंकार होत नाही. मिठाचा एक खडा खीर नासवतो, तसे अभिमान सर्व सेवा नासवतो.

राम जन्माला येण्यापूर्वी वाल्मिकीनी रामायण लिहिले, आणि रामाने मागाहून जन्म घेऊन त्यात वर्णन केल्याप्रमाणे आचरण करून दाखविले. म्हणजे रूप अस्तित्वात येण्यापूर्वी नाव होते आणि रूप गेल्यावर आजही नाव शिल्लक आहे. देश काळाच्या पलीकडे जे टिकते ते सत्य होय, जे सत्य असते ते श्रेष्ठ असलेच पाहिजे.

श्री स्वामी समर्थ महाराज पुराणपुरुष आहेत. तेच राम, तेच श्रीकृष्ण, तेच एकमेव सत्य व श्रेष्ठ आहेत, म्हणूनच श्री स्वामी महाराजंना आपण आपले श्रीगुरुपद घेण्याविषयी विनंती गुरुपौर्णिमेस करीत असतो.

आपल्या देहाची वाढ जशी आपल्याला नकळत होत असते, तशी आपली पारमार्थिक उन्नतीही आपल्याला नकळत झाली पाहिजे. ती कळली तर सर्व फुकट जाण्याचा संभव असतो, परमार्थात ‘मिळविण्यापेक्षा’ ‘टिकविणे’ हेच जास्त कठीण परंतु महत्वाचे असते. ज्याला ‘ मी काही तरी झालो’ असे वाटते तो काहीच झालेला नसतो. अशा माणसाने फारच सांभाळले पाहिजे.

“सबसे बडा गुरु | गुरूसे बडा गुरुका ध्यास |”

बाळाप्पा सारखा ध्यास प्रत्येकाला श्रीगुरू दर्शनासाठी लागायला पाहिजे. भगवंत हा सर्वसत्ताधीश खरा पण एका बाबतीत तो लुळा-पांगळा होतो व सहज अडकतो. भुंगा जसा लाकूड पोखरतो पण कमळात अडकतो, तीच स्थिति ध्यास घेणाऱ्याबाबत सद्गुरूंची होते.

आपल्या सेवेने घरात आजारी पडलेला मनुष्य बरा व्हावा असे म्हणणे किंवा कोणत्याही येहिक सुखाची ईछा करणे म्हणजे सेवेचा विषयाकडे उपयोग करणे, बरे झाल्यावर ज्याप्रमाणे आम्ही बाटलीतले औषध टाकून देतो, त्याप्रमाणे गरज संपली की आम्ही श्री स्वामी महाराजांना विसरतो. अमुक एक घडावे असे जिथे वाटते, तिथे सेवेत कमतरता आली असे समजावे. सद्गुरुवचनावर विश्वास ठेवला म्हणजे सुखदु:खाच्या गोष्टीचा मनावर परिणाम होत नाही. कर्म करण्याने अभिमान येतो आणि गुरुआज्ञेत वागल्याने तोच अभिमान नाहीसा होतो.

बीजगणीतामद्धे उदाहरण सोडवीताना एक अज्ञात अक्षर प्रमाण मानावे लागते, उदाहरणाचे उत्तर येईपर्यन्त त्या अज्ञात अक्षराची किंमत काय आहे हे आपल्याला कळत नाही. पण ते अक्षर घेतल्याशिवाय चालत नाही. त्याप्रमाणे जीवनाचे कोडे सोडविण्यासाठी अज्ञात असलेला भगवंत आपल्याला गृहीत धरावाच लागतो. त्या भगवंताचे खरे स्वरूप, जन्ममरणातून मुक्त होण्याचा मार्ग जो आपल्याला दाखवितो तो खरा सद्गुरू होय. म्हणून आपला मान,अभिमान, शहाणपण ही सर्व गुंडाळून ठेवून सद्गुरू सांगतील तसे सबब न सांगता वागणे.

आपली प्रगती योग्य मार्गाने होण्यासाठी बंधनाची आवश्यकता असते. सर्वात उत्तम बंधन म्हणजे आपले पहिले गुरु आपले ‘माता-पिता’ ते सांगतील त्याप्रमाणे वागणे. आपले आई वडील चुकणार नाहीत असे नाही, कारण चुकणे हा मनुष्याचा धर्म आहे; परंतु आपल्याविषयी त्यांची हितबुद्धी असल्याने, त्यांची चूक आपले कायमचे नुकसान करणार नाही, म्हणून कष्टी होऊ नये.

एकदा एक बाई सोवळे नेसून स्वयंपाक करीत होत्या, त्या बाईचे मूल झोपून उठल्यावर, ‘आई मला घे’ म्हणून रडू लागले. आई म्हणाली, ‘बाळा, मी तुला घ्यायला आतुर झाली आहे, पण तू कपडे तेवढे काढून घे.’ परंतु मुलगा कपढे काढायला तयार होइना, आणि ‘आई आई’ म्हणून रडू लागला. तेंव्हा शेजारच्या बाईने येऊन मुलाचे कपडे काढले आणि मग आईने मुलाला पोटाशी घेतले. आपलेही त्या लहान मुलाप्रमाणे झाले आहे. वासना, विकार, अहंभाव इत्यादीचे कपडे न काढताच आपण परब्रह्मला भेटण्याची ईछा करतो. सद्गुरू आपल्या अंगावरची वासना, विकार, अहंभावाची आवरणे काढून टाकतात आणि आपली भेट परब्रह्मशी घडवून आणतात.

नवविधा भक्तीत जशी श्रवण ही पाहिली भक्ति, तसे सद्गुरू लक्षणात शांती हे पहिले लक्षण आहे. पृथ्वी ही क्षमा-शांतिरूप आहे. त्याप्रमाणे सद्गुरू हे क्षमा-शांतीचे मूर्तिमंत स्वरूप असतात. एकनाथांची शांती अगाध होती. ज्ञानेश्वरांचे नाव टिकले कारण ते शांतीची मूर्ती होते. ज्या महर्षि व्यासांचा जयंती दिन आपण आज गुरुपौर्णिमा साजरा करतो तेही शांतिसवरूपच आणि महर्षि व्यासांनी ज्याना ‘कृष्णं वंदे जगद्गुरूम’ म्हटले ते परब्रम्ह श्रीकृष्णही शांतिसवरूपच होते.

Share On:

Leave a Comment