गुरुचरित्र पारायण कसे करावे?

(वाचन पद्धती, संकल्प व नियमांसहित )

gurucharitra parayan

श्री गुरुचरित्र हा परम प्रासादिक आणि पवित्र ग्रंथ आहे. या ग्रंथाचे श्रद्धापूर्वक पठन केल्यास याचे अनेक दिव्य अनुभव येतात,अडलेली कामे पूर्ण होतात, मनशांती लाभते, सर्व प्रकारचे संकटे, दुःख, बाधा, आजार, कर्जबाजारीपणा, यावर ‘श्री गुरुचरित्र’ हा संजीवनी ग्रंथ आहे, आणि म्हणून सर्वाना याचे पारायण करावेसे वाटते पण  त्याचबरोबर प्रश्न येतो तो म्हणजे याचे पारायण कसे करावे ?, त्यासाठी कोणते नियम असतात ?, संकल्प कसा  करावा ? आणि अजून बरेच काही तर आपल्या याच सर्व प्रश्नांचे उत्तर आपल्याला या लेखात मिळणार आहेत. चल तर सुरू करुयात.

 पारायणाची पूर्वतयारी – श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी, समक्ष चार कुत्रे व गाय, यांना नैवेद्य द्यावा. (चार कुत्रे म्हणजे, चार वेद व १ गाय म्हणजे दत्तात्रेयांची कामधेनु असल्याने हा नियम पाळावा.) पारायणापूर्वी फुले (विशेषतः देशी गुलाबाची) हार, तुळशी, सुगंधी उदबत्ती, धूप, कलश, विड्याची पाने, नैवेद्यासाठी पेढे  किंवा अन्य काही, अष्टगंध, चंदन, अत्तर (हिना), रांगोळी, दोन आसने, १ चौरंग, चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड, चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रेयांचे आसनाभोवती रांगोळी काढावी. चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे, प्रमुख दरवाज्यात तोरण बांधावे, चौरंगाजवळ डाव्या बाजूस समई लावावी. वाचन चालू असेपर्यंत, समई लागलेली असावी व अगरबत्ती पेटती ठेवावी.पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळचे मंदिरात जाऊन विडा सुपारी व नारळ ठेवून, सदर पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी. घरातील  वडील मंडळीस नमस्कार करून, पारायणासाठी आसन ग्रहण करावे.

 • प्रथम अथर्वशीर्ष वाचावे.
 • १  माळ गायत्री जप.
 • १  माळ श्री स्वामी समर्थ जप .
 • अथवा दत्त मंत्र म्हणावा

नंतर विधिवत संकल्प करून, पोथी वाचण्यास सुरुवात करावी. शक्यतो गुरुचरित्राचे वाचन हे सोवळ्यातच करावे. सोवळे नसल्यास स्वच्छ शुभ्र धूतवस्त्र (धुतलेले ) नेसूनच करावे. पँट अथवा नेहमीच्या वस्त्रावर पारायण कधीच करू नये.

पारायणाकरीता शास्त्रोक्‍त संकल्प- प्रथम आचमन करावे. आचमनाचे वेळी उजव्या हातावर पाणी घेऊन ॐ केशवाय नमः ॐ नारायणाय नमः ॐ माधवाय नमः म्हणून तीन वेळा पाणी (हातावरचे) नंतर दोन वेळा ताम्हणात पाणी सोडून, हात जोडून विष्णुंची खालील २४ नावे म्हणावीत.

 1.  ॐ केशवाय नमः        
 2. ॐ नारायण नमः       
 3. ॐ माधवाय नमः      
 4.  ॐ गोविंदाय नमः     
 5. ॐ विष्णवे नमः      
 6. ॐ मधुसुदनायनमः
 7. ॐ त्रिविक्रमाय नमः     
 8. ॐ वामनाय नमः     
 9. ॐ श्रीधराय नमः  
 10. ॐ ॠषीकेषाय नमः
 11. ॐ पद्मनाभाय नमः
 12. ॐ दामोदराय नमः
 13.  ॐ संकर्षणाम नमः
 14. ॐ वासुदेवाय नमः   
 15. ॐ प्रद्युम्नाय नमः  
 16. ॐ अनिरुद्धाय नमः
 17.  ॐ पुरुषोत्तमाय नमः
 18. अधोक्षजाय नमः  
 19. ॐ नरसिंहाय नमः 
 20. ॐ अच्च्युताय नमः
 21.  ॐ जनार्दनाय नमः  
 22. ॐ उपेन्द्राय नमः       
 23.  ॐ हरये नमः  
 24. ॐ श्रीकृष्ण परमात्मने नमः

प्राणायाम – प्रथम डावी नाकपुडी उजव्या हाताचे करंगळी शेजारचे दोन्ही बोटांनी बंद करावी व नंतर श्वास उजव्या नाकपुडीने आत घेऊन, डावी ना कपुडी अंगठ्याने दाबावी व मनात गायत्री मंत्र म्हणावा. श्वास सोडताना प्रथम डाव्या नाकपुडीवरील दोन्ही बोटे काढावी व नंतर उजव्या नाकपुडीवरील बोट काढून श्वास बाहेर सोडावा.

संकल्प – उजव्या हातात उदक (पाणी ) व अक्षता घेऊन खालीलप्रमाणे संकल्प करावा . त्याशिवाय इष्ट फल प्राप्त होत नाही हे लक्षात असावे. तसेही कोणत्याही उपासनेसाठी प्रथम संकल्प करावयासच हवा. संकल्प करण्यापूर्वी गुरू दत्तात्रेयांचे फोटोकडे/ पोथीकडे एकाग्र चित्ताने पाहावे व संकल्प म्हणावा. ‘‘ॐ तत्सत श्रीमद्भगवते महापुरुषस्य, विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य, अद्य ब्राह्मणो, द्वितीये परार्धे, विष्णुपदे, श्री श्वेत वाराह कल्पे, वैवस्वत मन्वन्तरे, अष्टविंशतितमे, युगचतुष्के, कलीयुगे, प्रथमचरणे, जम्बुद्विपे, भरतवर्षे, भरतखण्डे, दक्षिणापथे, रामक्षेत्रे बौद्धावतारे, दण्डकारण्ये देशे, गोदावर्याः दक्षिण तीरे, शालीवाहन शके… नाम संवत्सरे… अयने… ॠतो… मासे… पक्षे… तिथी… वासरे… दिवस नक्षत्रे… योगे… करणे… राशिस्थिते… वर्तमाने चन्द्रे… राशिस्थिते श्री सूर्ये… राशिस्थितेश्री देव गुरौ शेषेषु, ग्रहेषु यथायथं, राशिस्थानस्थितेषु, सत्सु एवंगुण विशेषणां, विशिष्टायां, शुभपुण्यतिथौ, मम आत्मनः, सकलशास्त्र, पुराणोक्‍त फलप्राप्तर्थं, मम, इह जन्मनि, जन्मजन्मान्तरे च, स्त्रि-पुत्र-पौत्र-धन-विद्या यश-आयुरारोग्याद्य भिष्ट कामनासिध्दिप्राप्तर्थ… पूजन (गुरुचरित्र पारायणं) अहं करिष्ये, आदौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थं, महागणपति स्मरणं च करिष्ये ॥’’ असे म्हणून, हातातील उदक ताम्हणात सोडावे व नंतर हे पाणी तुळशीस टाकावे. रिकाम्या जागी पंचांगात बघून योग्य ते शब्द म्हणावेत. उपरोक्‍त संकल्प ज्यांना शक्य नसेल त्यांनी मराठीत देखील दिवस, वार, तिथी, स्थळ बोलून मनोकामना सिद्धीसाठी असे बोलून, संकल्प सोडला तरी चालतो.

पारायण काळात पाळावयाचे नियम-  श्री गुरुचरित्र पारायण करीत असताना, पाठकाने काही नियमांचे कटाक्षाने पालन करणे आवश्यक आहे. त्याशिवाय या पारायणाचा कसलाही अनुभव येत नाही, असे पाठकास जाणवावयास लागेल. हे नियम श्री टेंबेस्वामींसारख्या काही अधिकारी पुरुषांनी तयार केलेले असल्याने, त्यांना विशेष महत्त्व आहे व आपण त्यांचे पालन करणे अगत्याचे आहे. पारायण नियम खालीलप्रमाणे आहेत.

 • संपूर्ण वाचन सोवळ्यातच व्हावे.
 •  वाचन सुरू करण्यापूर्वी अंगाला व कपाळाला भस्म लावावे. (हे भस्म गाणगापुरचे असल्यास अतिशय उत्तम.)
 • वाचन मनात न करता स्वतःला ऐकू येईल एवढ्या मोठ्याने करावे.
 • वाचनापूर्वी, संध्या व १०८ वेळा गायत्री जप, अवश्य करावा. (पूज्य श्री टेंबेस्वामींनी हा जप ५०० वेळा सांगितलेला आहे.)
 • गुरुदत्तात्रेयांसाठी एक मोकळे आसन (पाट) समोर ठेवावा, ज्या ठिकाणी श्री गुरुचरित्राचे वाचन सुरू असते त्या ठिकाणी श्री दत्तप्रभूंची फेरी अवश्य होते. त्यांनी क्षणभर तरी पाटावर, आसनावर बसावे, यासाठी हा पाट किंवा आसन ठेवावे. पाटाभोवती रांगोळी अवश्य काढावी. अगरबत्ती ठेवावी.
 • रोजचे वाचन संपेपर्यंत, मधे काही बोलू नये. तसेच आसनही सोडू नये. देवासमोर, वाचन सुरू असेपर्यंत नंदादीप ठेवावा व शुद्धतुपाचा दीप लावून ठेवावा.
 • रोज एकदा हविष्यान्न घ्यावे. (हविष्यान्नात साळीचे तांदूळ, जव, मूग, वाटाणे, दूध-भात, तूप, सुरण, पांढरा मुळा, नारळ, फणस, केळे इत्यादी पदार्थ येतात, असे ‘धर्मसिंधु’ ग्रंथात सांगितले आहे.)
 • कडक ‘ब्रह्मचर्य’ पाळावे, यात कायिक, वाचिक अशा सर्व प्रकारच्या ब्रह्मचर्याचा समावेश होतो.
 • मीठ, तिखट, आंबट या काळात पूर्ण वर्ज्य करावीत. साखर खावी पण गूळ खाऊ नये. गव्हाची पोळी, तूप, साखर चालेल. पण कांदा, लसूण आणि सर्व मांसाहारी, पदार्थ पूर्ण वर्ज्य. संध्याकाळी शक्यतो फक्‍त दूध प्यावे.
 • सात दिवसात शक्यतो दाढी करू नये.
 • पायात जोडा, चामड्याची चप्पल घालू नये.
 • वायफळ चर्चेत उगाच वेळ घालवू नये, तो वेळ श्री दत्त स्मरणात घालावा, सत्कारणी लावावा.
 • ‘भूमिशय्या’, म्हणजे जमिनीवर चटई अथवा पांढरे घोंगडे अंथरून त्यावर झोपावे.
 • झोपतांना, शक्यतो डाव्या कुशीवर झोपावे. (उजवा कान वर आल्याने काही द‍ृष्टान्त वगैरे होतो.)
 • समाराधनेच्या (सांगता) दिवशी महानैवेद्य करावा, त्यात पुरणपोळी व घेवड्याची भाजी अवश्य असावी. श्री दत्तात्रेयांना पुरणपोळी विशेष प्रिय असून गाणगापूर दत्तस्थानी, महानैवेद्याला रोजच पुरणपोळी असते.
 • पारायण काळात बाहेर कोठेही काहीही खाऊ नये, परान्न कटाक्षाने टाळावे.
 • या काळात केवळ सत्यच बोलावे, कोणावरही टीका. टिपणी करू नये, अवास्तव चर्चा करू नये, वादविवाद, अहंपणा टाळावाच.
 • रात्री दत्तजप करून खड्या आवाजात दत्तस्तोत्रे म्हणावीत व श्रीदत्त देवताच्या अनुसंधानात राहावे.
 • वाचन दुपारी १२.०० चे आत संपवावे. १२.०० ते १२.३० या वेळात वाचन करू नये.
 • सांगता दिवशी ब्राह्मण, सुवासिनीला, भोजन द्यावे. खण, खारका, सुपारी, विड्याची पाने यांचा विडा, जायफळ पत्री घालून, सुवासिनीस द्यावा
 • पारायणाची सुरुवात शुक्रवारी करावी व गुरुवारी समाप्ती करावी, या योगे शनिवारी अकरावा अध्याय-जन्माचा व सोमवारी शिवाचा पस्तिसावा अध्याय वाचनात येतो, असे, औदुंबर येथे, १९६८ साली समाधिस्त झालेले महान दत्तभक्‍त पू. श्री. नारायणनंदतीर्थ हे म्हणत असे. त्यांची भक्‍तमंडळी याच पद्धतीने पारायणे करायचीत.
 • विटाळाला फार जपावे. वाचन काळात परस्त्रीच्या हातून अन्न घेऊ नये. आपली आई, बहीण व पत्नी यांच्याच हातचे खावे.

नियम फार आहेत, तरी देखील उपरोक्‍त पैकी आजच्या कलियुगात जमेल तेवढे नियम पाळून पारायण करणे. केवळ एकाग्रता, एक चित्‍त होऊन, मनोभावे, पारायण करावे. सर्व प्रकारचे संकटे, दुःख, बाधा, आजार, कर्जबाजारीपणा, यावर ‘श्री गुरुचरित्र’ हा संजीवनी ग्रंथ आहे, तरी भाविकांनी, सदैव श्री गुरुचरित्राचे पारायण करून संकटमुक्‍त व्हावे. ज्यांना पारायण जमणार नाही, अशांनी निदान ५ ओव्या तरी नित्य वाचण्यात ठेवाव्यात. दुःखमुक्‍तीचा मार्ग, ‘श्री गुरुदत्तात्रेयांच्या’ कृपेने निश्चितच सापडेल.

.खालील विडियो द्वारे आपण अधिक माहिती घेऊ शकता.

 

Share On:

1 thought on “गुरुचरित्र पारायण कसे करावे? (वाचन पद्धती, संकल्प व नियमांसहित )”

Leave a Comment